वाशीम - मालेगाव तालुक्यातील आडोळ प्रकल्पाचा दरवाजा नादुरुस्त असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मात्र अद्यापही प्रशासनाने या गंभीर बाबीची कोणतीच दखल घेतलेली नाही.
मालेगाव तालुक्यातील बोराळा येथील आडोळ प्रकल्पावरून रिसोड, शिरपूर, रिठद गावाला पाणी पुरवठा केला जातो. त्याच बरोबर परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देण्यात येते. सध्या प्रकल्पात 71 टक्के जलसाठा झाला आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून प्रकल्पाचे गेट नादुरुस्त असल्याने पाणी वाहत असल्याने टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
मागील दोन वर्षांपासून हा दरवाजा बिघडलेल्या परिस्थितीत असल्याने पाण्याची नासाडी होत आहे. प्रशासनाने अद्याप कोणतेही पाऊल न उचलल्याने नागरिक रोष व्यक्त करत आहेत. संबंधित लघु सिंचन विभागाने या प्रकरणात लक्ष देऊन दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.