वाशिम - कोरोनाकाळातही जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई जिल्ह्यात आले नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. पालकमंत्री हरवले असून, कुणाला सापडल्यास 1 रुपया बक्षीस देण्यात येईल, अशा आशयाचा फलक घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पोलीस स्टेशनसमोर आंदोलन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पालकमंत्री हरवल्यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळत आहेत. कोरोनाच्या थैमानाने जिल्ह्यातील नागरिक भयभीत झालेले आहेत. अपुऱ्या सुविधा, बेड, ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनच्या टंचाईने यात आणखीच भर घातली आहे. नागरिक विविध समस्यांचा सामना करत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री मात्र गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात फिरकलेले नाहीत, असा आरोप करत भाजपा व शेतकरी स्वाभिमानी संघटनेने 'आपण पालकमंत्र्यांना पाहिलतं का ?' असे अनोखे आंदोलन करून पालकमंत्र्यांचा निषेध नोंदवला.
सक्रिय रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्येही खाटांची संख्या तोकडी पडत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनची टंचाई आहे. जीवन- मरणाच्या या अदृश्य लढाईत जिल्ह्याचे पालक नेमके कुठे हरवले आहेत? असा प्रश्न उपस्थित करून शेतकरी संघटनेने पालकमंत्र्यांविरोधात अनोखे आंदोलन छेडले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विभागीय प्रमुख दामोदर इंगोले, बालाजी मोरे पाटील आदी उपस्थित होते.