वाशिम - जिल्ह्यात सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी आहे. मात्र, नागरिक रात्री उशिरा घराबाहेर पडत असल्याचे समोर आल्याने पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. पवन बनसोड यांनी कारवाईचा बडगा उचललाय. संध्याकाळी ठिकठिकाणी नाकाबंदी करून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानाला सकाळी 8 ते सायंकाळी पाच पर्यंत वेळ निश्चित केली आहे. तर संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, नागरिक रात्री उशिरा विनाकारण शहरात फिरत असल्याने आता त्यांच्यावर कारवाई सुरू झालीय.
कारवाई दरम्यान साथरोग कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. तसेच वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता लॉकडाऊन कडक करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने याआधी स्पष्ट केले होते. त्याच पार्श्वभूमीवर कारवाई होत असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.पवन बनसोड यांनी सांगितले.