वाशिम - विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना लसीकरण केंद्र व शहरातील कंटेन्मेट झोनल भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, तहसीलदार विजय साळवे व नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांची उपस्थिती होती.
कोरोना लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी त्यांनी यावेळी संवाद साधला. लसीकरणाबाबतची माहिती आपणास कशी मिळाली व लसीकरण केंद्रावर आपण कोणासोबत आले, याबाबतची माहिती संबंधित वृद्धांशी संवाद साधताना आयुक्तांनी जाणून घेतली. कोरोना लस घेतल्यानंतर काही त्रास जाणवत आहे का? याबाबत देखील आयुक्तांनी माहिती घेतली.
आयुक्तांची कंटेन्मेट झोनला भेट
कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास अथवा कोरोनाबाधित गृह विलगीकरणात राहत असल्यास त्याचे घर कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात येते. वाशिम शहरातील नवीन आययुडीपी कॉलनी व योजना कॉलनी येथे ज्या घरी कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, त्या कंटेन्मेट झोनला विभागीय आयुक्तांनी भेट दिली. गृह विलगीकरण कक्षात असलेल्या रुग्णांशी त्यांनी यावेळी संवाद साधला. कोरोनाचे नियम पाळा, विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करा, घाबरून जाऊ नका, वेळेवर औषधे घ्या असे आवाहन देखील यावेळी आयुक्तांनी केले.
हेही वाचा - अखेर तारीख ठरली! 21 मार्च रोजी होणार राज्यसेवा पूर्व परीक्षा
हेही वाचा - पोलिसांना कुत्रे म्हणणे अतिशय चुकीचे, अनिल बोंडेंवर कारवाई करा -हसन मुश्रीफ