वाशिम - जगभरात मृत्यूचे तांडव माजवणाऱ्या कोरोना विरोधातील लढाईत वाशिम जिल्हा बाजी मारू पाहत असतानाच पुन्हा एकदा माशी शिंकली. मेडशी येथे 3 एप्रिलला आढळलेल्या एकमेव बाधित रुग्णाचा दुसरा तपासणी अहवाल 'निगेटिव्ह' आल्यामुळे जिल्हावासियांना झालेला आनंद क्षणभंगूर ठरला. रुग्णाचा आज आलेला तिसरा तपासणी अहवाल चक्क ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. त्यामुळे ग्रीन झोनच्या उंबरठ्यावर येवून उभ्या असलेल्या जिल्ह्याला पुन्हा एकदा हुलकावणी बसली.
यामुळे जिल्हावासियांच्या चिंतेत काहीशी भर पडली आहे. मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील 65 वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण गत 15 दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अलगीकरण कक्षात औषधोपचार घेत आहे. 14 दिवसांच्या उपचारानंतर तपासणीस पाठविलेल्या त्यांच्या 'थ्रोट स्वँब'चा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे त्यानंतर 24 तासाच्या अंतराने म्हणजेच 17 एप्रिलला पाठविण्यात आलेला तिसरा नमुना निगेटिव्ह आला असता, तर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असती, मात्र तिसरा तपासणीचा आज प्राप्त झालेला अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आता या रुग्णाचा रुग्णालयातील मुक्काम तुर्तास पाच दिवसांनी वाढला आहे.