वाशिम - जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे मालेगाव तालुक्यातील अमनवाडी ते कुत्तरडोह पुलावरून पाणी वाहत आहे. या पाण्यात वाहून चाललेल्या कोथळी येथील मोटारसायकल स्वारांना ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढले.
शेलूबाजार येथेही मुसळधार पावसामुळे मरीआई मंदिराजवळच्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे नागपूर -औरंगाबाद द्रुतगतीमार्गावरील वाहतूक काही काळ बंद आहे. शेलूबाजारमध्ये सर्व रस्त्यांवर वाहनांच्या रांगाच रांगा दिसत आहेत. पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे. वनोजा येथील नाल्यालाही पूर आला आहे. या पुरामुळे वनोजा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र व तांड्याचा गावापासून संपर्क तुटला आहे.
दरम्यान, वाशिम जिल्हात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, तूर, उडीद या पिकांसोबत अनेक शेतकऱ्यांनी मुगाची पेरणी केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मूग पिकाची स्थिती चांगली होती. मुगाच्या शेंगा परिपक्व झाल्यामुळे चांगले उत्पादन मिळण्याची आशा शेतकऱ्यांना होती. परंतु, गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुगाच्या शेंगातील दाणे भिजल्याने त्यांना कोंब आले आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे.