वाशिम - शहरातील चार दुकाने फोडणाऱ्या चोरट्यांना रोख रक्कमेसह जेरबंद करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी चोरट्यांकडून १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
कैलास बिष्णोई, ओमप्रकाश बिष्णोई, व अभिषेक पवार असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. मागील आठवड्यात चोरट्यांनी शहरातील चार दुकाने फोडल्यामुळे एकच खळबळ माजली होती. चोरांना शोधण्याचे मोठे आव्हान वाशिम पोलिसांसमोर होते. मात्र, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी तीन अट्टल चोरांना अटक केली आहे. पोलिसांनी चोरट्यांकडून ३५ हजार रोख रक्कमेसह एक लाख ६० हजारांचा मुद्देमालही जप्त केला आहे. अटक करण्यात आलेले कैलास बिष्णोई, ओमप्रकाश बिष्णोई हे राजस्थान येथील रहिवासी असून, अभिषेक पवार हा वर्धा जिल्ह्यातील रहिवासी आहे. तपास करीत असताना आरोपींनी यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातही चोरी केल्याची कबुली दिली आहे. यामुळे आरोपींना त्या ठिकाणी वर्ग करणार असल्याची माहिती, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिली आहे.