वाशिम - वंशाला दिवा पाहिजे म्हणून आजही समाजात मुलाचाच हट्ट धरला जातो. मात्र, वाशिम जिल्ह्यातील तऱ्हाळा येथील नारायण वाघमारे याला अपवाद ठरले आहेत. त्यांना तीन मुलीच आहेत. त्यांनी मुलाप्रमाणे मुलीला शिक्षण दिले. त्यामुळे आज त्यांच्या तीनही मुली पोलिस प्रशासनात काम करत आहेत. सतत मुलाचा हट्ट धरणाऱ्या समाजासमोर वाघमारे कुटुंबाने एक आदर्श ठेवला आहे.
तऱ्हाळा येथील नारायण वाघमारे यांचा पत्नी व तीन मुली मिळून पाच जणाचे कुटुंब आहे. नारायण यांना एकरभर शेती आहे. त्यामुळे ते शेतमजुरी करतात. मात्र, त्यांनी मुलीला चांगलं शिक्षण दिले. नारायण वाघमारे यांची मोठी मुलगी प्रिया (वय २४), भाग्यश्री (वय २१) आणि श्रद्धा (वय १९) या तिघींचे प्राथमिक शिक्षण तन्हाळा येथे, माध्यमिक शिक्षण शेलुबाजार व पदवीचे शिक्षण मंगरूळपीर या तालुक्याच्या ठिकाणी झाले.
तिघींनीही शिक्षणासोबतच नोकरीची जिद्द मनात ठेवून प्रयत्न केले. त्यामुळे प्रिया ही २०१३ च्या पोलिस भरतीत शिपाई पदाकरिता पात्र ठरली. आपल्या मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवून भाग्यश्री व श्रद्धा यांनीही पोलीस दलातील सेवेकरता प्रयत्न सुरू केले होते. त्यांनाही यश आले. त्याही पोलीस झाल्या. तिघींनी मिळवलेल्या यशाचे तन्हाळा परिसरात मोठे कौतुक होत आहे.