वाशिम - मालेगाव तालुक्यात एका शेतातील सोयाबीनच्या गंजीला अज्ञातांनी आग लावल्याची घटना घडली आहे. शेतकरी प्रमिला बाई इंगळे यांच्या तीन एकर शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग लावण्यात आली होती. त्यामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
तीन एकरातील सोयाबीन जमा करुन बनवलेल्या गंजीला अज्ञताताने रात्री आग लावली यात पुर्ण सोयाबीन जळून खाक झाले आहे. हा प्रकार मालेगाव तालुक्यातील खिर्डा येथे घडला आहे. खिर्डा येथील महिला शेतकरी इंगळे यांनी तीन एकर जमिनीवर सोयाबीन पिक घेतले होते. सोयाबीन काढणीस आल्याने शेतातील सोयाबीन जमा केली. एका ठिकाणी ढीग घातला मात्र रात्री अज्ञातानी या ढिगाला आग लावली. या आगीत संपूर्ण सोयाबीन जळून खाक झाले आहे. अगोदरच पावसाच्या तडाख्यातून जे काही उरलेले सोयाबीन देखील जाळल्याने आर्थिक संकट कोसळले आहे.
पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर आग लावणाऱ्या अज्ञातांचा शोध लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच इंगळे यांना आर्थिक मदत प्रशासनाने करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.