वाशिम - हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला वट पौर्णिमा हा सण आज राज्यभर साजरा होत आहे. मात्र, यावर्षी या सणावर कोरोनाचे सावट पहायला मिळाले. वट पौर्णिमा सणानिमित्त वाशिम जिल्ह्यातील शिरपूर या गावी महिलांनी मास्क बांधून वडाच्या झाडाची पारंपारिक पद्धतीने पूजा केली.
वट पौर्णिमेच्या सणाला विवाहित महिलांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. या दिवशी महिला आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. यंदा मात्र कोरोना संसर्गामुळे महिलांना साधेपणाने आणि आरोग्याची काळजी घेत हा सण साजरा करावा लागला. अनेक ठिकाणी महिलांनी सोशल डिस्टन्स पाळत आणि तोंडाला मास्क बांधूनच वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या.