वाशिम - श्रीमती साळुंकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालय, ग्राम तन्हाळा येथे विद्यार्थ्यांनी श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली. काळाची गरज लक्षात घेऊन वन्यजीवांना व पशुपक्ष्यांना पाणी उपलब्ध व्हावे, हा उद्देश ठेऊन साळुंकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी तब्बल ७५० सिमेंटच्या गोण्यांमध्ये माती भरून वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली.
वाशिम जिल्हा हा सतत पाणीटंचाईचा सामना करत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी अनेक संस्था व शासन कार्य करत आहेत; पण परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. अपेक्षित यश मिळालेले दिसत नाही. पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी आपलाही हातभार लागावा म्हणून साळुंकाबाई राऊत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली.