वाशिम - कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ९ मे ते १५ मे या कालावधीत जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून, सर्व नागरिकांनी या आदेशाचे पालन करून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
जिल्ह्यात कडक निर्बंध
वाढती रुग्णसंख्या पाहता जिल्ह्यात अधिक कडक निर्बंध लावण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ९ मे रोजी दुपारी १२ वाजेपासून ते १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले असून जिल्हावासियांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.
नाईलाजाने घेण्यात आला निर्णय
कडक निर्बंध लावण्याचा निर्णय हा खुशीने घेतलेला नाही. तर सद्यस्थितीत वाढणारी रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठीचा उपाय म्हणून कडक निर्बंध लावणे आवश्यक आहे. नाईलाजाने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करून, जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री देसाई यांनी केले आहे. तसेच रुग्णवाढ आटोक्यात येताच हळूहळू सर्व सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रशासन नक्की प्रयत्न करेल, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - नवी मुंबईतील मेट्रोचा मुहूर्त ठरला; मेट्रोची चाचणी यशस्वी