वाशिम - शेतकऱ्यांना बँकेने कर्ज उपलब्ध करून द्यावे, अन्यथा कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले आहेत. त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.
यंदाच्या खरीप हंगामात राज्य सरकारने 1 लाख 15 हजार 178 शेतकऱ्यांना 1600 कोटींचे पीककर्ज वितरीत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र बँकांमार्फत संथगतीने कर्ज वाटप सुरू असून,आजपर्यंत 53 हजार 994 शेतकऱ्यांना 403 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात केवळ 25 टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक 53 टक्के जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वाटप केले आहे. तर 13 टक्के राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज वाटप झाले आहे.
जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना बँकेने कर्ज उपलब्ध करून द्यावे, अन्यथा बँकांवर कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिल्या आहेत. तसेच बोगस बियाणांबाबत देखील त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. काही ठिकाणी पेरण्या झाल्यानंतर पीक उगवले नाहीय. अशा शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेण्यात आली असून त्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले.