वाशिम - मालेगाव शहरातील नवीन बसस्थानकावर एसटी बस नेण्यास चालक टाळाटाळ करत आहेत. याच प्रकारातून गुरूवारी दोन विद्यार्थिनींना मालेगावला न उतरवता थेट वाशिमला नेल्याची घटना घडली.
मालेगाव येथून शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. मालेगाव येथील तरन्नुम खानम व सानिया खान या दोन विद्यार्थिनी गुरूवारी पातूर येथे गेल्या होत्या. सायंकाळी घरी येण्यासाठी दोघी एमएच २० बीएल ४१५० क्रमांकाच्या अकोला - पुसद बसमध्ये बसल्या. मात्र, पातूरवरून मालेगाव येथे येत असताना सदर बस बसस्थानकावर गेलीच नाही. दोघी विद्यार्थीनींनी वाहक आणि चालकाकडे मालेगाव येथे उतरवण्याची विनंती केली. मात्र, बस न थांबवता दोघींना थेट वाशिमला नेले.
हेही वाचा - पालिकेच्या कंत्राटदारांवर प्राप्तीकराच्या धाडी सुरूच; ईडीही गुन्हा दाखल करण्याची शक्यता
या विद्यार्थिनींनी घरी फोन करून ही घटना सांगितली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी मालेगाव पोलीस व वाशिम बसस्थानकात तक्रार करत संबधित चालक-वाहकावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर दोघींना त्याच बसमध्ये बसवून वाशिमवरून रात्री साडेआठच्या सुमारास पुन्हा मालेगाव येथे आणण्यात आले. त्यांनी ही संपूर्ण घटना मालेगाव पोलिसांना कथन केली. महामंडळाच्या या भोंगळ कारभाराबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.