वाशिम - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळ (सीआईएसफ) जवान तस्लीम सलीम मुन्नीवाले यांच्यावर शुक्रवारी १७ जानेवारीला येथील बायपास जवळच्या मुस्लिम कब्रिस्थानमध्ये सकाळी ११च्या सुमारास प्रशासनाच्या वतीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेला जनसागर उसळला होता. ‘अमर रहें, अमर रहें, तस्लीम भाई अमर रहें’ च्या घोषणांच्या निनादात साश्रुनयनांनी या वीरास निरोप देण्यात आला.
वाशिम जिल्ह्यातील गवळीपूरा मधील मूळ रहिवासी तस्लीम मुन्नीवाले हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळामध्ये (सीआईएसफ) कार्यरत होते. कर्तव्यावर असताना मंगळवारी (१४ जानेवारी) सहकारी कर्मचाऱ्यांनी गोळी झाडून त्याची हत्या केली होती. सेवा बाजावतांना मृत्यू झाल्याची बातमी मिळाल्यानंतर परिसरात शोककळा पसरली होती. मागील दोन दिवसांपासून सर्व तरुण मंडळी सर्व व्यवहार बंद ठेवून अंत्यसंस्काराच्या तयारीत व्यस्त होते. जम्मू काश्मीर येथून (दि.१६) रात्रीच्या विमानाने जवान तस्लीमचे पार्थिव नागपुरात दाखल झाले. त्या नंतर अमरावती मार्गे पार्थिव कारंजा आणण्यात आले. सर्वप्रथम मुन्नीवाले कुटुंबियांच्या घरी पार्थिव काही वेळ ठेवण्यात आले. त्यानंतर मुस्लिम विधीनुसार नमाज़े जनाजा अदा करण्यात आली. अंतिम दर्शनकरिता कारंजा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवरामध्ये पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यानंतर शहरातील मुख्य मार्गावरून फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये अंतिमयात्रा काढण्यात आली. दरम्यान केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळ (सीआईएसफ) व जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली.
नागरिकांनी स्वयंफूर्तीने आपली प्रतिष्ठाने तसेच सर्व व्यवहार बंद ठेऊन अत्यंयात्रेत सहभाग नोंदवला. नगरपालिकेच्या सर्व शाळांना बंद ठेवण्यात आली होती. नागरिकांनी जागोजागी अभिवादनाचे फलक लावत श्रद्धांजली वाहिली. या ठिकाणी आमदार राजेंद्र पाटणी, काँग्रेस नेते मो. युसूफ पुंजानी, नगराध्यक्ष शेषराव ढोके, उपविभागीय अधिकारी अनुप खांडे, मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, नायब तहसीलदार विनोद हरणे, ठाणेदार एस.एम.जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना पुष्पचक्र अर्पण करून आदराजंली वाहिली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. जवान तस्लीम यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सर्वधर्मीय हजारो नागरिक यावेळी उपस्थित होते.
जवान तस्लीम यांची हलाखीची परिस्थिती असतानाही शिक्षण घेत वर्दी घालण्याची त्यांची जिद्द कायम होती. २००८ मध्ये ते नोकरीत रुजू झाले होते. त्यांना दोन लहान मुले आहेत. त्यांच्या निधनाने शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सकाळी तस्लीम यांचे पार्थिव गावात येण्याअगोदरच नागरिकांनी त्यांच्या घरासमोर गर्दी केली होती. देशासाठी बलिदान देणाऱ्या तस्लीम मुन्नीवाले यांना साश्रुपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.