वाशिम- दिवाळीच्या दिवशी सर्वत्र लक्ष्मीपूजन केले जात असताना महापुरूषांच्या विचारांचा वारसा घेऊन त्याप्रमाणे वाटचाल करणार्या सासूबाईंनी आपल्या सुनांनाच लक्ष्मी मानून त्यांचे पूजन केले. त्याचबरोबर, सुनांना साडीचोळी भेट देत अनोख्या पध्दतीने रविवारी (२७ ऑक्टोबर) दिवाळी साजरी केली. या आगळ्यावेगळ्या स्नुषापूजन कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शहरातील ड्रीम लँड सिटी या कॉलनीत राहणाऱ्या सिंधुबाई सुभाष सोनोने यांनी आपल्या सुनांना घरातील लक्ष्मीचा दर्जा दिला आहे. त्यांच्यावर निरंकारी मिशनच्या सुदीक्षा सविंदर हरदेवजी यांच्या स्त्री-पुरुष समानतेच्या विचारांचा पगडा आहे. याच विचारातून त्यांनी गौरी सणाच्या वेळी आपल्या सुनांना लक्ष्मीचा दर्जा देऊन त्यांची पूजा अर्चा केली होती. रविवारी दिवाळी निमित्त सर्वत्र मूर्तीच्या लक्ष्मीचे पूजन केल्या जात होते. मात्र, सिंधुबाई सोनोने यांनी आपली थोरली सून व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका सौ. रेखा सचिन सोनोने व धाकटी सून सौ. पल्लवी प्रमोद सोनोने यांना देव्हाऱ्यात विराजमान करून त्यांची मनोभावे पूजा अर्चा केली.
सिंधुबाई यांनी आपल्या दोन्ही सुनांना जेवू घातले व त्यांचे दर्शन घेतले. तसेच, त्यांचे चिरंजीव सचिन व प्रमोद सोनोने यांनी सुद्धा आपल्या पत्नीचे पूजन केले व त्यांना साडीचोळी भेट दिली. आजही समाजात काही अपवाद वगळता घरातील कुठल्याच निर्णय प्रक्रियेत महिलांना सहभागी केले जात नाही. स्त्रियांना दुय्यम दर्ज्याची वागणूक दिली जाते. अशा या वातावरणात सिंधुबाई यांनी आपल्या सुनांना घरातील लक्ष्मी माणून त्यांचे पूजन केले व समाजात स्त्रियांचा सम्मान करण्याचे संदेश दिले. चुकीच्या रूढी परंपरांना छेद देऊन सत्याचा मार्ग दाखविणार्या या उपक्रमाची आता सर्वत्र चर्चा होत आहे.
हेही वाचा- परतीच्या पावसाने वाशिम जिल्ह्याला झोडपले; रिसोडमध्ये घर आणि दुकानात शिरले पाणी