वाशिम - जिल्ह्यातील कामरगाव येथे लसीकरणाचा दुसरा डोस घेण्यासाठी मोठी गर्दी उसळत आहे. सकाळी चार वाजल्यापासून नागरिक रांगेत उभे राहत आहे. मात्र, लसीकरणाला वेळ लागत असल्यामुळे अखेर नागरिकांना आपल्या चपला रांगेत ठेऊन झाडाखाली विश्रांती घेल्याचे दिसून आले. काही जणांनी तर आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी पाण्याच्या बाटल्या ठेवल्या होत्या.
लसीचा तुटवडा
गेल्या दहा दिवसांपासून नागरिक लस मिळावी म्हणून केंद्रावर येत आहेत. लसीच्या तुटवड्यामुळे रोज त्यांना माघारी फिरावे लागते. रोज उन्हाचा त्रास होत असल्यामुळे आम्ही चप्पलांच्या रांगा लावून सावलीत बसत असल्याचे नागरिक सांगत आहेत. कामरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर आजूबाजूच्या गावातील रोज शेकडो जेष्ठ नागरिक येतात मात्र, लस मिळत नसल्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर जर लस कधी मिळणार याबाबत माहिती लावण्यात आली तर वृद्ध नागरिकांना विनाकारण यावे लागणार नसल्याची भावना इतर नागरिक व्यक्त करत आहेत.