वाशिम - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास अहवाल येईपर्यंत वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नका, अशी विनंती पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज यांनी राज्य सरकारला केली आहे. त्तपूर्वी संजय राठोड आपल्या मंत्री पदासोबतच आमदार पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती जितेंद्र महाराज यांनी ईटीव्ही भारतला फोनवर दिली होती. मात्र, आता जिंतेंद्र महाराज यांनी राठोड यांचा राजीनामा न घेण्याची विनंती राज्य सरकारला केली आहे. तर संजय राठोड आज (रविवार) पोहरादेवी येथे येणार असल्याची चर्चा आहे.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने उडी घेत आत्महत्या केली. पूजा चव्हाण ही मुळची बीड जिल्ह्यातील परळीची रहिवासी होती. ती पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी गेली होती. याबाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिच्या आत्महत्या प्रकरणाशी कथितरित्या निगडीत असलेल्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरत विरोधी पक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.