वाशिम - मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ना.ना. मुंदडा कृषी उत्पन्न बाजार समितीवर आज सकाळी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. यात बंदुकीच्या धाकावर लाखो रुपये लंपास केले असल्याची माहिती समोर येत आहे.
मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या नागपूर मुंबई या राज्य महामार्गावरील ना.ना. मुंदडा कृषी उत्पन्न बाजार समितीवर आज १४ जून रोजी सकाळी साडेचार वाजता दरम्यान सात ते आठ सशस्त्र दरोडेखोरांनी प्रवेश करून बिहार येथील एका हमाल कर्मचाऱ्यावर बंदूक रोखून दरोडा टाकला आहे.
ना.ना. मुंदडा या खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती ही एकूण पाच एकर परिसरात मागील पाच वर्षांपासून कार्यान्वित आहे. आज १४ जून रोजी सकाळी साडेचार च्या दरम्यान दोन सुरक्षा रक्षक हे आपले कर्तव्य बजावत होते. दरम्यान, कार्यालयाच्या बाजूला झोपलेल्या एका बिहार राज्यातील हमाल कर्मचारी याच्या छातीवर पाय ठेवून बंदुकीचा धाक दाखविला व दोन कार्यालयाचे दरवाजे तोडून आत प्रवेश केला आणि आतील कॅबिन तोडून ड्राव्हरमधील जवळपास तेरा लाख रुपयांची रक्कम लुटून नेली असल्याची घटना घडली आहे.