वाशीम : संपूर्ण देशात व राज्यात कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव बघता सध्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची व पाल्झ्माची नितांत गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा राज्यभर रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात सोमवारी 3 मे रोजी जनशिक्षण संस्थान येथे भव्य रक्तदान महाशिबिरामध्ये 114 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या रक्तदान शिबिराचे खासदार भावना गवळी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना खासदार गवळी म्हणाल्या की, या शिबिराच्या माध्यमातून कोरोना महामारीच्या काळात शिवसेनेकडुन एक मदतीचा हात म्हणून शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच जिल्हाभरामध्ये टप्याटप्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. जेणेकरून कोविडच्या रुग्णांना शिवसेनेच्या माध्यमातून मदत होईल व युवकांना रक्तदान करण्याचे त्यांनी आवाहन केले.
रक्तदान शिबिरादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांनी रक्त संकलनाची जबाबदारी पार पाडली. यामध्ये डॉ. कोमल टापे, सचिन दंडे, शालीनी सावळे, संजु घोडे, लक्ष्मण काळे, अतीक शेख यांनी परिश्रम घेतले. या शिबिराला शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.