वाशिम - दिवसेंदिवस संकरित आंब्याची लागवड वाढत असल्याने गावरान आंब्याची संख्या झपाट्याने घटत असल्याचे चित्र सगळीकडे पाहायला मिळत आहे. मात्र, वाशिम जिल्ह्यातील रिधोरा येथील गुलाबराव घुगे यांच्या शेतातील एका आंब्याच्या झाडापासून वर्षाकाठी ५२ हजारांचे उत्पन्न मिळत आहे.
हे आंब्याचे झाड ३५ वर्षे जुने असून या झाडापासून दरवर्षी जवळपास २५ क्विंटल आंबे त्यांना मिळतात. यंदा त्यांनी गावातील व्यापाऱ्याला ५२ हजार रुपयांत हा आंबा विकला आहे. झाड गावरान असल्याने आंब्याची चव चांगली असून याला बाजारात मोठी मागणी असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.
झाड चांगले असल्यामुळे गावातील व्यापारी सिद्धार्थ कांबळे दरवर्षी हे आंब्यांचे झाड विकत घेतात. आंब्यांची मालेगाव, वाशिम अकोला या बाजारामध्ये विक्री होते. खाण्यासाठी आणि लोणच्यासाठीही हा आंबा उत्तम असल्याचे कांबळे यांनी सांगितले.