वाशिम- शिरपूर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघातातही वाढ झाली आहे. दररोज होत असलेले अपघात व प्रशासनाच्या वतीने अजुनही त्या खड्ड्यांची डागडुजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे शहरातील युवकांनी प्रशासनाच्या निषेधार्थ बुधवारी खड्ड्यांमध्ये केळीचे झाडे लावून निषेध केला.
वाशिम जिल्ह्यातील शिरपूरच्या रस्त्याची मागील कित्येक वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. या रस्त्याची डागडुजी करावी यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. शिवाय ग्रामस्थांनी आमरण उपोषणे देखील केली. मात्र याकडे लोकप्रतिनिधी, स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे बस स्थानक परिसरातील रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांत गावातील युवकांनी केळीची झाडे लावुन निषेध नोंदवला.
ग्रामपंचायतने लवकरात लवकर गावातील रस्त्याचे काम केले नाही तर यापुढे रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करणार असल्याचा यावेळी इशारा देण्यात आलाय.