वाशिम - संपूर्ण देशात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले आहे. या संकटातून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यास आरोग्य विभागासह पोलीस कर्मचारीही अहोरात्र झटत आहेत. कर्तव्यासमोर येणाऱ्या प्रत्येक समस्येवर मात करून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी या खऱ्याखुऱ्या देवदूतांकडून लावण्यात येत आहे.
कोरोनाच्या संकटापासून नागरिकांचे रक्षण करण्यात आरोग्य विभाग व पोलीस बांधव आपल्या जीवाची पर्वा न करता शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. इतर वेळी टीकेचे लक्ष्य ठरणारा पोलीस विभाग आज मात्र देवदूताच्या भूमिकेत नागरिकांची ढाल बनून कर्तव्य बजावत आहे. वाशिम येथे शहर वाहतूक शाखेत असलेल्या महिला पोलीस मनीषा चौके या 7 महिन्यांच्या गरोदर आहेत. शासन निर्णयानुसार आपल्या हक्काची रजा घेऊन पोटातील बाळाची काळजी घेत घरी आराम करण्याऐवजी त्या आपल्या कर्तव्यावर तैनात आहेत.
दिवसाची सुरुवात होताच त्या आपल्या कर्तव्यावर -
जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे 20 मे ते 27 मेपर्यंत जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत . त्यानंतरही काही नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरतांना दिसत आहे. अशा विनाकारण फिरणाऱ्यांवर कार्यवाही करण्याकरिता वाशिम पोलिसांकडून ठीक ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. ज्यामध्ये शहरातील बाबासाहेब आंबेडकर चौकात ही विनाकारण फिरणाऱ्या वर कारवाई करण्याकरीता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. त्यामध्ये एका 7 महिन्यांच्या गरोदर महिला पोलिसांचा सुद्धा समावेश आहे. दिवसाची सुरुवात होताच त्या आपल्या कर्तव्यावर येतात. त्यानंतर येथे विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांसोबत दुपारच्या कडक उन्हामध्ये ही महिला आपल्या कर्तव्यापासून माघार न घेता आपले कर्तव्य यशस्वीपणे पार पाडत आहे. त्यामुळे या पोलिस भगिनीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा - Live Updates : बार्ज पी ३०५ दुर्घटनेतील शोध मोहीम सुरूच; आतापर्यंत ६० मृतदेह हाती