वाशिम - 'साहेब, कोरोना संकटात काम करताना आमच्याकडे किट नाहीत, मास्क नाहीत, सॅनिटायझरही नाही... उलट कामाचा ताण वाढला आहे... तुम्ही जर मुख्यमंत्री असता तर आमच्यावर ही वेळ आली नसती,' अशी भावना जऊळका पोलीस स्टेशनच्या एका पोलिसाने, माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली.
देवेंद्र फडणवीस रविवारी रात्री नागपूरहून मुंबईला निघाले होते. किन्हीराजा येथे हायवेवर पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसाने त्यांची गाडी अडवली आणि त्याने आपल्या भावना त्यांच्यापुढे व्यक्त केल्या. फडणवीस यांनीही त्या पोलिसाची परिस्थिती ऐकून घेतली.
फडणवीस यांना तो पोलीस म्हणाला, 'कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेली किट्स, मास्क किंवा सॅनिटायझर यासारख्या वस्तू मला उपलब्ध करून दिलेल्या नाहीत, याकडे तुम्ही लक्ष द्या. तुम्ही मुख्यमंत्री असता, तर ही वेळ आली नसती.'
दरम्यान, कोरोना बाधितांची वाढणारी संख्या, पाहून राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या काळात पोलीस यंत्रणेवर ताण येत आहे. अशात राज्यात अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, कार्यरत असलेल्या पोलिसांना मास्क, सॅनिटायझर या मूलभूत गोष्टी पोहोचवण्याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.
हेही वाचा - ऐकावं ते नवलच; लग्नासाठी सजूनधजून निघाला नवरदेव . . .पोलिसांनी चेकपोस्टवर अडवून लावलं लग्न
हेही वाचा - मानोरा तालुक्यात शेतातील गोठ्याला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान