वाशिम - रिसोड तालुक्यातील चाकोली येथील पोलीस पाटील गोविंद भुजंगराव गरकळ यांनी १२ वर्षीय अल्पवयीन मुलावर बंदुकीची गोळी झाडून जखमी केल्याची घडला घडली आहे. या प्रकरणी दिलीप रामराव गरकळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस पाटील गोविंद गरकळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ओम गरकळ असे जखमी मुलाचे नाव आहे.
कारण अस्पष्ट
शेतातील वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी अनेक शेतकरी छऱ्याच्या बंदुकीचा वापर करतात. परंतु चाकोली येथील पोलीस पाटील गोविंद गरकळ यांनी वन्य प्राण्याऐवजी थेट एका १२ वर्षांच्या मुलाच्या उजव्या दंडावर शेतकरी छन्याच्या बंदुकीने गोळी झाडून त्याला जखमी केले. या घटनेची गावात चर्चा होताच पोलीस पाटील गोविंद गरकळ याने शेतकरी बंदूक लगेच मोडून टाकली. मात्र, त्यांनी या मुलावर का गोळी झाडली हे अद्याप ही स्पष्ट झाले नाही.
तपास सुरू
जखमी झालेल्या ओमला घेऊन घरच्यांनी रिसोड पोलीस स्टेशन गाठले आणि लेखी तक्रार दिली. त्यानंतर पोलीस पाटीलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.