वाशिम - गेल्या अनेक दिवसापासून रखडलेल्या रिसोड ते वाशीम रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेने रास्ता रोको केला. विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात आसेगाव-कोयाळी फाटा येथे हे आंदोलन करण्यात आले.
रिसोड ते वाशीम रस्त्याचे नूतनीकरण सुरु असताना कंत्राटदाराकडून अचानक काम बंद करण्यात आले. त्यामुळे वाहनाचालकाचे आणि प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. नोकरी व व्यापाराच्या दृष्टीने रिसोड वाशिम ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, जिल्हा मुख्यालयाला जोडणाऱ्या या प्रमुख रस्त्याचे काम रखडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच, ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवल्यामुळे वाहनाचालकांना रस्त्यातून वाट काढणे कठीण झाले आहे. त्यामुळे रस्त्याचे हे रखडलेले काम पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली.
तसेच, या प्रकरणी दुर्लक्ष करणाऱ्या संबधित कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाबद्दल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली. या रस्त्याचे काम सुरू असताना केलेल्या पर्यायी मार्गाचीही योग्य ती निगा राखण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारही आंदोलनकर्त्यांनी दिला.