वाशिम - जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. काल(रविवारी) रात्री मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार, लाठी, गोगरी, ईचा, हिरंगी, नागी परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने पपई, टोमॅटो, गहू, टरबूज, कांदाबीजांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा संकट आले आहे. जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून भरीव मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
विविध ठिकाणी शेतमालाचे नुकसान -
शेतकरी संतोष लांभाडे यांचे तीन एकर कांदाबीज आणि तीन एकर उन्हाळी मूग जमीनदोस्त झाला आहे. तर, प्रल्हाद राऊत यांची 3 एकर पपई आणि तीन एकर कांदाबीज असे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर, चिखली येथील अविनाश चौधरी यांचा अडीच एकरवरील कांदा नष्ट झाला. मालेगाव तालुक्यातील करंजी येथील संतोष लहाने यांचे दोन एकरातील टोमॅटो पीक जमीनदोस्त झाले आहे. याशिवाय काढणीला आलेल्या गहूपिकाचे देखील गारपीटीमुळे नुकसान झाले. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
जिल्ह्यातील 4 हजार 880 हेक्टर पिकांचे नुकसान -
वाशिम जिल्ह्यात मागील दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने 6 हजार 697 शेतकऱ्यांच्या 4 हजार 880 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. येत्या काही दिवसात पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर केले जाईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर यांनी दिली.
हेही वाचा - नाशिक : तळवाडे दिगर येथे तुफान गारपीट, कांद्यासह भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान