वाशिम - कारंजा तालुक्यातील ग्राम वापटी कुपटी येथील एक इसम पुलावरुन वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. सदरहू व्यक्तीची दुचाकी ही एक किलोमीटर दूर खोलीकरणात सापडली असल्याने ही भीती बळावली आहे. गाळ मोठ्या प्रमाणावर असल्याने, तसेच या पात्रात झाडे व झुडपेही भरपूर असल्याने शोध मोहीमेमध्ये अडचणी येत आहेत. तर सदरहू व्यक्ती आज न सापडल्याने, उद्या पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.
कारंजा तालुक्यातील ग्राम वापटी-कुपटी येथील रहिवासी बाबुलाल खडसे हे आपले टेलरिंगचे काम आटोपून भूलोडा मार्गे वापटी-कुपटी कडे निघाले होते. यावेळी जोराचा पाऊस सुरू होता. त्यामुळे मार्गावरील पुलावरुन पाणी जात होते. या पाण्याच्या वेगाचा अंदाज न आल्याने, दुचाकी घसरुन ते दुचाकीसह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ, पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन यांनी शोध मोहीम सुरू केली. याबाबत सर्वधर्म आपातकालीन संस्थेचे (सास) प्रमुख शाम सवाई यांना माहिती दिली असता, त्यांनी तात्काळ सासचे पथक घटनास्थळाकडे रवाना केले.
यावेळी राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत पुलापासून १ किलोमीटर अंतरावर खोलीकरणात बाबुलाल यांची दुचाकी (एमएच 37 आर 8117) आढळून आली. मात्र सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत खडसे यांचा पत्ता लागला नाही. या भागात गाळ खुप मोठ्या प्रमाणावर असून, भुलोडा ते अंबोडा पर्यंत झुडुपेही मोठ्या संख्येने असल्याकारणाने शोध मोहिमेत अडचण येत आहे. यामुळे आता रविवारी पुन्हा शोध घेणे सुरू करण्यात येणार आहे.
हेही वाचा : वाशिममध्ये एका दिवसात 7 'पॉझिटिव्ह'; बाधितांचा आकडा 48 वर