वाशिम - दोन लहान मुलांसह आईने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जिल्ह्यातील तोंडगाव येथे आज दुपारच्या सुमारास उघडकीस आली. जयश्री गजानन गवारे (28), गणेश गवारे (5) आणि मोहित गवारे (3), असे आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत.
तोंडगाव येथील जयश्रीचे जांभरुण नावजी (ता. वाशिम) या गावात लग्न झाले होते. मात्र, मागील एका वर्षापासून ती सासरकडील मंडळीच्या त्रासाला कंटाळून वडिलांच्या घरी राहत होती. दरम्यान, नातेवाईकांनी १७ जुलैला या प्रकरणावर सामोपचारातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, याला सासरकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज नागरिक व्यक्त करत आहेत. या घटनेचा पुढील तपास वाशिम पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.