वाशिम - केंद्रीय निवडणूक आयोगाने नवे डिजिटल कार्ड मतदारांच्या हाती सोपविले आहे. मतदान ओळखपत्र पाहिले की डिजिटल युगाचा भास होतो. मात्र, या डिजिटल कार्डवर अनेक चुका आढळून येत आहेत. रिसोड येथील एका वृद्धाला चक्क १९ वर्षीय तरुण दाखवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नवीन निवडणुक ओळखपत्र बनविने, त्यामध्ये दुरुस्ती व इतर कामासाठी कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय काम होत नाही. मात्र, सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यावरही ओळखपत्रामध्ये चुका असतील तर निवडणुक आयोग किती निष्काळजीपणे काम करते हे समोर येत आहे.
रिसोड येथील मोमीनपुरा भागात राहणारे मो. सिद्दीक मो. शरिफ (वय-७०) यांनी आपले मतदान ओळखपत्र डिजिटल व्हावे यासाठी आधार कार्ड, राशन कार्ड व इतर अन्य कागदपत्रे आयोगाकडे सादर केली होती. मात्र, जेव्हा डिजिटल ओळखपत्र हातात आल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांच्या मतदान ओळखपत्रावर जन्म तारीख चुकीची नमूद करत त्यांचे वय फक्त १९ वर्ष करण्यात आले आहे.
यातून निवडणुक आयोगाचा गलथान कारभार दिसुन येत आहे. ओळखपत्र बनवणाऱयाने निदान छायाचित्र बघून तरी वय टाकायचे, असा प्रश्न मोहम्मद सिद्दीकी यांनी केला.