वाशिम - कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अकोला जिल्हा परिषदेने कोविड केअर सेंटर उभारून ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. याच धर्तीवर वाशिम जिल्हा परिषदेनेदेखील कोविड केअर सेंटर उभारून ग्रामीण रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आज त्या संदर्भात 100 बेड कोविड सेंटर तयार करण्यासाठी जि. प. अध्यक्ष श्याम गाभाने, आमदार अमित झनक इतर अधिकारी यांची बैठक पार पडली.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेत आरोग्यविषयक सुविधा अपुऱ्या पडत आहेत. ग्रामीण भागातही कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले असतानाही तेथे अद्याप कोणत्याच सुविधा उपलब्ध झालेल्या नाही आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण निष्पन्न झाले, तर त्यांना तालुकास्तरीय कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाते. वाशिम जिल्हा कोविड रूग्णालय व कारंजा उपजिल्हा रुग्णालयाचा अपवादवगळता एकाही सरकारी कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार किंवा ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची सुविधा उपलब्ध नाही. यामुळे गोरगरीब व ग्रामीण भागातील रुग्णांची होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामीण भागातून जोर धरत आहे. ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी जिल्हा परिषदेकडे जिल्हा परिषद शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व अन्य शासकीय इमारती उपलब्ध आहेत. मनुष्यबळही बऱ्यापैकी उपलब्ध होणारे असल्याने जिल्हा परिषदेने प्रत्येक तालुक्यात एक कोविड केअर सेंटर उभारण्याचा विचार या बैठकीत झाला आहे.