वाशिम - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजत असून विरोधक आक्रमक झाले आहेत. मात्र, या संदर्भात बंजारा समाजाचे धर्मगुरू रामराव महाराज यांचे धर्मपिठाधिश्वर बाबूसिंग महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पोहरादेवी येथे बैठक झाली. यावेळी सर्वच महंतांनी संजय राठोड यांच्यावर जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत या प्रकरणाशी जोडणे योग्य नाही, त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा इथेच थांबवावी, अशी विनंती केली आहे.
पूजाला न्याय मिळाला पाहिजे -
पूजा चव्हाण यांनी केलेली आत्महत्या ही दुर्दैवी आहे. पूजाला न्याय मिळाला पाहिजे. मात्र, ऑडिओ क्लिपवर समाजाचे नेते संजय राठोड यांना बदनाम केल्या जात आहे. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी केल्यानंतर सत्य समोर येईल. देशातील संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी असल्याचे येथील महंतांनी सांगितले.
काय आहे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण -
बीड जिल्ह्यातील परळीमधील पूजा चव्हाण या २२ वर्षाच्या तरुणीचा रविवारी (दि. ७ फेब्रुवारी) इमारतीच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. ही हत्या की आत्महत्या यावरुन समाज माध्यमांमध्ये कॅबिनेट मंत्र्यांचा या घटनेशी संबंध असल्याची चर्चा चालू आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यातील राजकरण ढवळून निघाले आहे. या मुद्यावरून विरोधी भाजप आक्रमक झाली असून त्यांनी संबंधित मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तरुणीचे काही कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यावरुन पूजाने एका मंत्र्यांच्या दबावातून आत्महत्या केल्याचा आरोप विरोधीपक्षाने केला आहे. या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव असून पूजाच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील अनेक गोष्टी दडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय भाजपने व्यक्त केला आहे. तिच्या आत्महत्येनंतर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. त्यांच्या पूजासोबत बोलतानाच्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या कथित दहा-बारा क्लिपही व्हायरल झाल्याने राज्यभरात हा विषय तापलेला आहे.