वाशिम : बडनेरा - वाशिम रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, रेल्वे मार्गाचे काम अद्याप सुरू झाले नाही. शेतकऱ्यांसाठी व नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या या रेल्वे उपक्रमाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगरुळपीर येथील तालुका रेल्वे कृती समितीच्या वतीने सोमवारी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात बडनेरा - वाशिम रेल्वे मार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. तीन दशकापासून या रेल्वे मार्गासाठी मागणी होत होती. नागरिकांची मागणी लक्षात घेता प्रशासनाकडून वाशिम-बडनेरा रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, काम अद्याप सुरु झाले नाही. हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यास शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार आहे. त्यामुळे या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी मंगरुळपीर रेल्वे कृती समितीने सोमवारी मंगरुळपीर शहरात मोर्चा काढून केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना उप विभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिऊन रेल्वे मार्गाच काम सुरू करण्याची मागणी केली आहे. या मागणी कडे शासनाने लक्ष देऊन तातडीने या रेल्वे मार्गाचे काम सुरू करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कृती समितीकडून करण्यात आला आहे.