वाशिम - परतीचा पाऊस आणि वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे वाई गौळ येथील शेतकरी हरीचंद राठोड यांच्या ९ एकर शेतातील ज्वारी पिकाचे मोठे नुकासान झाले. सुमारे १५० क्विंटल ज्वारीचे उत्पन्न निघेल इतक्या प्रमाणात पीक नष्ट झाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र, प्रशासन याची दखल घेत नसल्यामुळे शेतकऱ्याने शेतातील कडबा शेतातच पेटवून देण्याची वेळ आली.
मानोरा तालुक्यातील वाईगौळ येथील हरीचंद राठोड यांच्याकडे 9 एकर शेती असून, 22 जनावरं आहेत. त्यांनी यंदा 9 एकरात ज्वारीची पेरणी केली. मात्र, हातातोंडाशी आलेला घास आधी वन्यप्राणी आणि नंतर परतीच्या पावसाने हिरावला गेला. शेतात पाणी साचल्याने कडबा ही सडला आहे. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी कडबा पेटवून देत शासनाच्या वेळ काढू धोरणाचा निषेध केला.