वाशिम - खासदार भावना गवळी यांच्या संस्थेच्या पार्टीकल बोर्ड कारखान्यात 100 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. हा 55 कोटीचा कारखाना असताना केवळ 25 लाखात विकत घेतला आहे. त्यामुळे या कारखान्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून पुढील दोन आठवड्यात कारवाई सुरू होणार असल्याचे भाजपा नेते किरीट सोमैया यांनी सांगितले. तर दुसरीकडे खासदार भावना गवळी यांनी सर्व आरोप फेटाळून टाकले असून भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांच्या घोटाळ्याची चौकशी ईडीकरून करण्याची मागणी केली आहे.
'शिवसेनेला घाबरत नाही'
भावना गवळी यांच्या ऑफिसमधून चोरी गेलेले सात कोटी रुपये आले कुठून असा सवाल उपस्थित आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री, खासदार यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही यावेळी किरीट सोमैया यांनी केला. आज (शुक्रवार) पार्टीकल बोर्ड कारखाना पाहण्यासाठी गेले असता, तुमच्यावर दगडफेक झाली यासंदर्भात विचारले असता मी शिवसेनेला घाबरत नाही. अशा धमक्या मला रोजच येतात, असे किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
'भावना गवळीवर दोन आठवड्यात कारवाई'
खासदार भावना गवळी यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. यासाठी मी ईडी, सीबीआय, राज्यसरकार तसेच केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून खासदार यांच्यावर दोन आठवड्यात कारवाई सुरू करणार असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत सोमैया यांनी सांगितले.
राजेंद्र पाटणीच्या चौकशीसाठी शाहांना भेटणार - गवळी
खासदार भावना गवळी यांनी किरीट सोमैया यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपाचे आमदार राजेंद्र पाटणी हे वाशिमचे भूमाफिया आहेत. यांनी 500 कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे भाजपाच्या आमदारांवर कारवाई करण्यासाठी मी अमित शाह यांना भेटणार असून ईडी, सीबीआयची चौकशी लावणार असून माझ्यावर झालेले आरोप खोटे असल्याचे भावना गवळी यांनी सांगितले.
'आक्रमक शेतकरी आणि शिवसैनिकांनी शाईफेक केली असावी'
शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थेच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर आज किरीट सोमैया याची पाहणी करण्याकरीता आले होते. मात्र भावना गवळी यांचे समर्थकांनी किरीट सोमैया यांना काळे झेंडे दाखवत त्यांच्या ताफ्यावर दगडफेक आणि शाई फेक केली. याविषयी खासदार भावना गवळी यांना विचारले असता, पार्टीकल बोर्ड कारखाना हा शेतकऱ्यांचा आहे. शिवाय पोलिसांनी कारखान्यावर जाऊ नका असे सांगूनही ते गेले, त्यामुळे शेतकरी आणि शिवसैनिक आक्रमक झाले आणि दगड फेक झाली असावी, असे भावना गवळी यांनी सांगितले.
हेही वाचा - राज्यात डाकुंचे सरकार -किरीट सोमैया