वाशिम - दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याने सगळीकडे पाणीटंचाईची दाहकता जाणवण्यास सुरूवात झाली आहे. अशातच कारंजा तालुक्यातील खेर्डा जिरापुरे येथील ग्रामपंचायतकडे पाणीपुरवठा योजनेचे २ लाख १६ हजाराचे वीजबिल थकल्याने महावितरणने विद्युत पुरवठा खंडीत केला. त्यामुळे गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी पंचायत समिती कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आला.
स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने त्यावर उपाय म्हणून १०० टक्के घर व पाणी करवसुलीचे फर्मान काढत पाणीपुरवठा बंद केला आहे. संपूर्ण कर भरल्याशिवाय पाणीपुरवठा सुरू करणार नसल्याची भुमिका घेतली. यामुळे गेल्या एक महिन्यापासून पाणीपुरवठा बंद असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी आज कारंजा पंचायत समिती कार्यालयावर घागर मोर्चा काढला. अखेर ग्रामस्थांच्या आक्रमकतेपुढे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने नांगी टाकली आणि पाणीपुरवठा सुरू केला.