वाशिम - कारंजा लाड येथील गुरुदेवनगरात अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी केली. चोरट्यांनी २५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घरमालकाच्या फिर्यादीनुसार कारंजा शहर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अशी झाली चोरी -
शहरातील बायपास परिसरातील गुरुदेवनगरात नगरे दाम्पत्य राहतात. ते कारंजा तालुक्यातील रामनगरच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. २५ एप्रिलला नगरे दाम्पत्य दारव्हा तालुक्यातील हरूगोंडेगाव येथे अत्यावश्यक कामासाठी गेले होते. सायंकाळी ५ वाजता ते घरी परत आले असता घराचे मुख्य प्रवेशद्वार उघडे असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता दोन खाण्याची रॅक उघडी दिसली. चोरट्यांनी त्यातील सोन्याचा ७५ ग्रॅम वजनाचा राणीहार, १२० ग्रॅम वजनाच्या चार पाटल्या, २७ ग्रॅम वजनाच्या तीन अंगठ्या, २७ ग्रॅम वजनाचा राणीहार, ५० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, ३० ग्रॅम वजनाचा पोहेहार, ५२ ग्रॅम वजनाचे दोन नेकलेस व अन्य दागिने, असा एकूण २५ लाख ५० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला.
पोलीस अधीक्षकांनी घेतली माहिती -
घरमालक मोतीराम तुकाराम नगरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चोरीच्या तपासासाठी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांची मदत घेण्यात आली. परंतु, त्यात यश आले नाही. शहरात कोरोना लॉकडाऊनच्या काळात दिवसाढवळ्या चोरी झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी कारंजा येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली व तपासाबाबत पोलिसांना आवश्यक त्या सूचना केल्या. शहरात चोरीच्या घटना वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.