वाशिम - जिल्ह्यामध्ये कोरानाची तीसरी लाट येण्यापूर्वीच वाशिम जिल्हा प्रशासनाकडून तिसऱ्या लाटेला हाताळण्याकरिता तयारी सुरू झाली आहे. वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये लहान मुलांकरिता 50, उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे 25 बेडचे, तर जिल्ह्यातील विविध ठिकाणी खासगी रुग्णालयांत 150 बेडचे कोविड 19 बाल रुग्णालय सुरू करण्याकरिता जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे.
हेही वाचा - कारंजा येथे खासगी डॉक्टराच्या दवाखान्यावर छापा; २५ लाखांचा अवैध औषधी साठा जप्त
..इतक्या आयसीयू बेडची व्यवस्था होणार
रुग्णालयांमध्ये लहान मुलापासून ते नवजात शिशूपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांचा उपचार करण्यात येणार आहे. लहान मुले आणि नवजात शिशूंकरीता आयसीयू बेडची सुविधा उपलब्ध असणार आहे. जिल्ह्यात रुग्णालयांमध्ये लहान मुलांकरिता 15 आयसीयू बेड आणि नवजात शिशूंकरिता 10 आयसीयू बेडची व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच, इतर बेड जनरल वॉर्ड रुपामध्ये कोरोना पॉझिटिव्ह मुलांकरिता ठेवले जाणार आहे.
जिल्ह्यात बालरोगतज्ज्ञांची फौज तयार
तीसऱ्या लाटेत 15 वर्षांखाली मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळून येण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यात अजून एकही रुग्ण नाही, मात्र येणारा धोका लक्षात घेता जिल्हाप्रशासन सतर्क झाला आहे. जिल्ह्यात बालरोगतज्ज्ञांची फौज तयार असून लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पूर्ण तयारी असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक मधुकर राठोड यांनी सांगितले.
कुठे किती बेड
वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात 50, कारंजा उपजिल्हा रुग्णालयात 25, बाहेती बाल रुग्णालय 30, बाजड बाल रुग्णालय 30, कानडे बाल रुग्णालय 30, नेनवानी बाल रुग्णालय 30, भट्टड बाल रुग्णालय 30, असे जिल्ह्यात एकूण 225 बेडची व्यवस्था असलेले लहान मुलांसाठीचे कोविड सेंटर उघडण्यात येणार आहे.
हेही वाचा - अत्यावश्यक सेवा देणाऱ्या रुग्णावाहिकांना रिलायन्सकडून मोफत इंधन पुरवठा