वाशिम - उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा परिषदच्या पाणी आणि स्वच्छता विभागाच्यावतीने ग्रामिण भागात जागर शाश्वत स्वच्छतेचा हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. जि. प. चे प्रभारी अध्यक्ष डॉ. शाम गाभणे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांनी आज (24 मार्च) जिल्हा परिषदेच्या प्रांगणात गुड मॉर्निंग पथकाच्या सहा वाहनांना हिरवी झेंडी दाखवुन या मोहिमेला सुरुवात केली.
हेही वाचा - धक्कादायक! रेल्वेच्या डब्यात धड नसलेले शीर आढळल्याने खळबळ
शौचालय असुनही लोक शौचालयाचा वापर न करता उघडयावर शौचास जात असल्याचे विदारक चित्र जिल्हयात पाहावयास मिळत आहे. यावर मात करण्यासाठी आणि अधिक अधिक लोकांनी शौचालयाचा वापर करावा या हेतुने गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातुन प्रयत्न करण्यात येत आहेत. याकरीता सर्व गावांमध्ये ग्राम स्वच्छता निगरानी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या पुढाकाराने सुरुवातीला निवडक 50 गावांमध्ये ही मोहिम प्राधान्याने राबविण्यात येणार आहे. तसेच या 50 व्यतिरिक्त इतरही गावात उघडयावर शौचास जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. शाम गाभणे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांनी या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुड मॉर्निंग पथकाच्या सहा वाहनचालकांना टुल किट चे वितरण करण्यात आले. शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप मोहनावाले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्हि. एन. वानखडे, पाणी व स्वच्छता विभागाचे सहायक प्रशासन अधिकारी रवि सोनोने, जिल्हा कक्षाचे क्षमता बांधणी सल्लागार प्रफुल्ल काळे, मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर, पाणी गुणवत्ता सल्लागार अभिजित दुधाटे आदिंची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन स्वच्छ भारत मिशनचे माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार राम श्रृंगारे यांनी केले.
हेही वाचा -अँटिलिया प्रकरणी यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हे समाविष्ट करण्यासंदर्भात अर्ज