वाशिम - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या शेतामध्ये बोअरवेल घेण्याचा सपाटा सुरू आहे. केंद्र सरकारच्या वतीने सुरू असलेल्या या मनमानी कारभारामुळे बळीराजा धास्तावला असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे.
भूगर्भातील इंधनसाठे शोधण्यासाठी या बोअरवेल्स घेतल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यातील शेलुबाजार परिसरात या बोअरवेल्स घेतल्या जात आहेत.
केंद्राच्या सूचनेनुसार सर्वेक्षण करून भुगर्भातील इंधनसाठे शोधले जात आहेत. मात्र, या संदर्भात शेतकऱ्यांना अंधारात ठेवण्यामागे काय गौडबंगाल आहे, याची माहिती मिळायला मार्ग नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत. तसेच समृद्धी महामार्गासाठी जमिनी बळकावल्यानंतर आता कोणते नवीन सर्वेक्षण सुरू होते आणि संकट उभे राहते, अशी चिंता शेतकाऱ्यांना पडली आहे.