वाशिम -अल्पवयीन मुलीला ४० हजार रूपयात राजस्थानमध्ये विकणाऱ्या टोळीला वाशीम पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यामुळे मोठ्या प्रकरणाचा खुलासा करण्यात वाशीम शहर पोलिसांना यश आले आहे. वाशीम येथील वाल्मीक नगर येथे राहणाऱ्या श्रीमती कल्पना अशोक पवार यांच्या तक्रारीवरून त्यांची मोठी बहीण अरूणा पवार यांच्या मुलीला (वय ११ वर्ष ८ महिने) घनश्याम पवार (रा.हतगाव) व जयेंद्र पवार (रा. बोरी ता. दारवा जिल्हा यवतमाळ) यांनी बाहेर फिरविण्यासाठी नेले होते. व नंतर अकोला येथून मुंबईला नेवून राजस्थानमध्ये विकले होते.
२६ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी
वाशीम पोलिसांनी पथक पाठवून दोन्ही आरोपींना गुजरातच्या बारडोली पोलीस स्टेशनच्या जिल्हा सुरत येथून अल्पवयीन मुलीसह ताब्यात घेतले. अटक केल्यानंतर पोलीस कस्टडीत अनेक गोष्टीचा उलगडा झाला. आरोपींनी तिला ४० हजार रूपयात विकल्याचे कबुल केले आहे. आरोपीच्या सांगण्यावरून राजस्थान येथून मदन बांगडवा, राकेश बांगडवा, संदीप बांगडवा यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरूध्द मुलीच्या जबाबावरून विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे.
गुन्ह्याचा तपास चालू
या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धृवास बावणकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमाकांत खंडारे, उपपोलिस निरीक्षक संतोष जंजाळ, अनिल पाटील, गणेश सरनाईक, विजय घुगे, लालमणी श्रीवास्तव, रामकृष्ण नागरे, ज्ञानदेव मात्रे, सुभाष राठोड, विलास महल्ले, प्रविण गायकवाड, मनोज पवार, तेजस्वीनी खोडके यांनी केले आहे.
हेही वाचा - BREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयचा छापा