वाशिम - शेतकऱ्यांच्या पीकाचे नुकसान झाल्यास त्यांना मोबदला मिळावा, यासाठी शासनाने पंतप्रधान पीकविमा योजना सुरू केली. मात्र, रिसोड तालुक्यातील हाराळ येथील एका शेतकऱ्याला भरलेल्या प्रीमियमपेक्षा फक्त 94 रुपये जास्त पीकविमा मिळाला आहे. त्यामुळे विमा कंपनीने पुन्हा भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानबा कलासरे या शेतकऱ्याने गेल्यावर्षी आपल्या 1 हेक्टर शेतीचा पीकविमा काढला. त्यासाठी त्यांनी 672 रुपये प्रीमियम भराला होता. मागील वर्षी शासनाने रिसोड तालुका दुष्काळग्रस्त घोषित केल्यानंतर त्यांना भरपाई मिळेल, अशी अशा होती. मात्र, बँकेत त्यांच्या खात्यावर 766 रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे संबंधित विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केली असून केवळ प्रीमियमपेक्षा फक्त 94 रुपये जास्त मिळाले आहेत.
रिसोड तालुक्यातील हाराळ येथील ज्ञानबा कलासरे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांनी मागील वर्षी 1 हेक्टर सोयाबीनचा पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत प्रीमियम भरला होता. गेल्यावर्षी तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झाला. त्यामुळे त्यांना चांगली रक्कम मिळेल, अशी अशा होती. मात्र , भरलेल्या रकमेपेक्षा केवळ 94 रुपयेच जास्त मिळाल्याने पीकविमा भरावा का नाही? असा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे.