वाशिम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा शेतकरीवर्गाला जबर फटका बसत आहे. सर्वत्र बंद असल्यामुळे शेतातील माल तसाच पडून खराब होत आहे. तर, दुसरीकडे ठिकाणी या शेतमालाला वाचवण्यासाठी शेतकरी हवा तसा प्रयत्न करत आहे. मात्र, आता आर्थिक खर्चाचा भार पेलावत नसल्याने शेतकऱ्यांवर पिकांना जमीनदोस्त करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. रिठद येथील एका शेतकऱ्याने त्यांची दोन एकरातील डाळिंबाची बागदेखील तोटा होत असल्यामुळे जमीनदोस्त करून टाकली.
जिल्ह्यातील रिठद येथील शुभदा नायक यांची शेनगाव तालुक्यातील पळशी येथे दोन एकरावर डाळींब शेती आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतात मजूर मिळणे कठिण झाले. तर, लागवडीचा खर्च वाढत असल्याने फळबाग शेती तोट्यात जात आहे. त्यामुळं त्यांनी दोन एकरातील 545 डाळींबाची झाडं जेसेबी लावून जमीनदोस्त केली आहेत. लाखो रुपये खर्च करूनही हाती काहीच न आल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे कृषी विभागाने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.