वाशिम - मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात कमी प्रर्जन्यमानामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. यंदा तर राज्य सरकारने रिसोड तालुक्यासह उमरी आणि जऊळका मंडळात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र दुष्काळग्रस्त भागात अजूनही दुष्काळी मदत मिळत नसल्याने पशुपालक त्रस्त झाले आहेत.
दुधाळ जनावरांना लागणाऱ्या खाद्यांनाचे दर वाढत चालले असून, कडबा, कुट्टी, सुकलेले गवत, कुटार या सारख्या पारंपरिक पद्धतीचा चाराही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने हे संकट अधिक गडद झाले आहे.
दुधालाही अपेक्षित दर मिळत नसल्याने जनावरांची बेभाव विक्री करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पशुपालकांना मदतीचा हात म्हणून अतिटंचाईग्रस्त भागात जनावरांसाठी चारा डेपो सुरू करावे, अशी मागणी पशुपालकांकडून होत आहे.