वाशिम - ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वेगवेगळ्या कलाकुसरीच्या वस्तूला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी रिसोड येथे कृषी विज्ञान केंद्र, करडा यांच्यावतीने आनंद संध्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ११० बचत गटांनी आपले स्टॉल लावले. तर या उपक्रमाला रिसोड शहरातील महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद देत एकाच दिवशी ४ लाखाची उलाढाल झाली आहे.
कृषी विज्ञान केंद्र, करडा यांच्याकडून ग्रामीण भागातील महिलांना वेगवेगळे प्रशिक्षण दिले जाते. महिला बचत गटांच्या महिला घरगुती वापरासाठी लागणाऱ्या वस्तू तयार करतात. मात्र, त्यांना व्यासपीठ मिळावे यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न केला आहे. याला रिसोडकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याने यापुढेही, असे उपक्रम राबविणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले.
ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तूला के.व्ही.के ने व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे महिलांसाठी एक पर्वणीच ठरली आहे. त्यामुळे शासनाच्यावतीने असे प्रदर्शन ठेवणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा हर्षदा देशमुख यांनी सांगितले.
आम्ही ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील महिला बचत गटांच्या माध्यमातून वेगवेगळे पदार्थ तयार करतो. मात्र, बाजारपेठ उपलब्ध नसल्याने विक्रीसाठी अडचणी येतात. मात्र, आज केव्हीके व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याने आमची चांगली उलाढाल झाली आहे. याप्रमाणे वर्षभर बचत गटांना बाजारपेठ मिळावी, अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली.