वाशिम - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी आपण विधानसभेत महाराष्ट्रातील कोविड सेंटरमधील घोटाळ्याबद्दल बोलला होता, याकडे सरकार किती गांभीर्याने लक्ष देत आहे, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. त्यांचं उत्तर देताना फडणवीस म्हणाले, की आम्हाला मिळालेल्या सर्व पुराव्यांसह आम्ही हे विधानसभेत सांगितले होते. तसेच आम्ही यावर एक पुस्तिकाही तयार केली आहे. सरकारने हे प्रकरण किती गांभीर्याने घेतले याची खात्री नाही, आता आपण कोरोनाविरोधात लढाई लढत आहोत. मात्र, परिस्थिती सामान्य झाल्यानंतर परंतु त्यानंतर आम्ही नक्कीच याबद्दल जाब विचारू, असंही ते म्हणाले.
मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, आघाडी सरकारने पाठपुरावा न केल्यामुळे आरक्षण टिकले नाही. आम्ही आरक्षण दिलं होतं आणि न्यायालयात टिकवले होते. मात्र, या सरकारच्या निष्काळजीपणामुळे ते रद्द झालं. तसेच मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याचा भाजपाने निर्णय घेतला असल्याचेही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले.