वाशिम - जिल्ह्यात सायबर हल्ल्यांना परतवून लावण्यासाठी वाशिम पोलीस विभागाचा सायबर क्राईम सेल सज्ज झाला आहे. प्रत्येक अलर्टवर कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांची करडी नजर असून मागील 24 तासात जिल्ह्यातील शंभराहून अधिक संगणकावर (हॅकर्सचा) सायबर हल्ला झाला आहे. मात्र, वाशिम सायबर सेलच्या टिमने काही मिनिटांतच या सायबर हल्ल्यांवर पलटवार करून बाधित संगणक दुरुस्त केले आहेत.
नागरिकांनी सायबर सुरक्षाविषयी जागरूक राहणे गरजे आहे. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतानासुध्दा अधिक सजगता दाखविणे महत्त्वाचे ठरते. सोशल मीडियावरून प्राप्त होणारे विविध व्हिडिओ, फोटो, ऑडिओ क्लिपबाबत पडताळणी अत्यावश्यक आहे. नागरिकांनी सोशल मिडियाचे अकाउंट वापरताना त्याचा पासवर्ड एकसारखाच ठेवू नये. दर आठवड्याला फेसबुक, ट्विटर, ई-मेल आदिंचा पासवर्ड अपडेट करत रहावे. हॅकर्स एखाद्या सर्वरवर पहिल्या प्रथम हल्ला चढवून त्याद्वारे नागरिकांची वैयक्तिक माहितीवर घाला घालण्याचा प्रयत्न करू शकतात. याविषयी जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी समस्त जनतेला कम्प्युटर, फसव्या मोबाईल ऑनलाईन व इतर लिंकसाठी अलर्ट राहण्याचे आवाहन केले आहे.