वाशिम - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली होती. ही संचारबंती ८ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहेत. यादरम्यान सर्व दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहतील. रुग्णालये, रुग्णवाहिका, औषधी दुकाने, ठोक भाजीपाला विक्री, रेल्वे स्थानक व बसस्थानक तसेच खाजगी बसने उतरणाऱ्या प्रवाशांकरिता ऑटोरिक्षा, हाय वेवरील पेट्रोल पंप, धाबे, एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग सुरू राहतील. तसेच कर्मचाऱ्यांना सोबत ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे.
मंडईमध्ये किरकोळ विक्रेत्यांनाच प्रवेश -
घरपोच दूध वितरण, रेस्टॉरंटमधील खाद्य पदार्थांच्या घरपोच वितरणास सकाळी ६ ते सकाळी ९ वाजेपर्यंत तसेच सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यात नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामीण भागातील आठवडी बाजार व गुरांचे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. प्रत्येक आठवड्यात शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार असून या काळात सर्व, दुकाने आस्थापना बंद राहतील. मात्र, या काळात दूध विक्रेते, डेअरी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा राहील. ग्राहकांनी दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी जवळपास असलेल्या बाजारपेठ, अतिपरिचित दुकानदार यांचा वापर करावा. शक्यतोवर दूरचा प्रवास करून खरेदी करणे टाळावे. ठोक भाजी मंडई सकाळी ३ ते ६ वाजेपर्यंत सुरू राहील. परंतु, मंडईमध्ये किरकोळ विक्रेत्यांनाच प्रवेश राहील, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी -
जिल्ह्यातील सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल, रेस्टॉरंट प्रत्यक्ष सुरू न ठेवता केवळ पार्सलसुविधा सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. सर्व धार्मिकस्थळे ही केवळ एका वेळी १० व्यक्तींपर्यंत मर्यादित स्वरूपात नागरिकांसाठी सुरू राहतील. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलन बंद राहणार आहेत. लग्न समारंभासाठी वधू-वरासह केवळ २५ व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल. त्याकरिता नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात संबंधित नगरपालिका, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांची, तसेच ग्रामीण भागाकरिता तहसीलदार यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील. लग्न समारंभ किंवा इतर छोट्या समारंभ, कार्यक्रमात २५ पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास संबंधित मंगल कार्यालय, सभागृह, लॉनचे चालक अथवा मालक, व्यवस्थापक यांना २० हजार किंवा प्रति व्यक्ती ५०० रुपये यापैकी जी जास्त असेल त्या रक्कमेचा दंड आकारला जाईल. दुसऱ्यांदा अशी बाब आढळून आल्यास मंगल कार्यालय, सभागृह, लॉन १५ दिवसांसाठी सील केले जाईल. लग्न समारंभ अथवा कोणत्याही कार्यक्रमाप्रसंगी गर्दी होणारी मिरवणूक काढता येणार नाही. आयोजकांनी लग्नस्थळी किती लोक उपस्थित राहणार आहेत, याची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला कळविणे बंधनकारक राहणार आहे.
शाळा महाविद्यालये राहणार बंद -
जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद राहतील. शहरी व ग्रामीण भागातील सर्व प्रकारची सिनेमागृह, मल्टिफ्लेक्स, व्यायामशाळा, स्पोर्ट कॉम्प्लेक्समधील इनडोअर, आऊटडोअर गेम्स, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे बंद राहतील. संचारबंदी कालावधीत होणाऱ्या पूर्वनियोजित परीक्षा या त्यांच्या वेळापत्रकानुसार घेण्यात येतील. परीक्षार्थींना या कालावधीत परीक्षेचे ओळखपत्र व पालकांनी त्यांचे ओळखपत्र जवळ ठेवणे बंधनकारक आहे.
हेही वाचा - खासदार डेलकर आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिला भाजपला इशारा