वाशिम : वाशिम शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांवर आता खासगी रूग्णालयातही उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी चार खासगी रूग्णालयातील 116 खाटा अधिगृहित करण्यात आल्या आहेत. या रूग्णालयात महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र असणाऱ्या कोरोना रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केले आहेत.
या चार खासगी रूग्णालयात खाटा राखीव -
या आदेशानुसार, वाशिम येथील डॉ. बिबेकर हॉस्पिटलमधील 40 खाटा (15 ऑक्सिजन खाटा), वाशिम क्रिटीकल केअर हॉस्पिटलमधील 16 (2 व्हेंटिलेटर व 12 ऑक्सिजन खाटा), डॉ. देवळे हॉस्पिटलमधील 40 (1 व्हेंटिलेटर व 21 ऑक्सिजन खाटा) आणि लाईफ लाईन हॉस्पिटलमधील 20 खाटा ( 2 व्हेंटिलेटर व 10 ऑक्सिजन खाटा) अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. या रुग्णालयांमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक आवश्यकतेप्रमाणे रुग्ण पाठविण्याची व्यवस्था करू शकतील.
रूग्णालयांना या सुविधा देणे बंधनकारक -
वाशिम येथील या खासगी रुग्णालयांना 'आयसीएमआर'ने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे, महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे व मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करणे; उपचारासाठी लागणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचारी, अधिकारी वर्ग चोवीस तास नियमितपणे उपस्थित ठेवणे, रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या व्यक्तींची माहिती गोपनीय ठेवणे, रुग्णालयामध्ये पुरेशा प्रमाणात प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब टेक्निशियन) आणि रुग्णवाहिका असणे बंधनकारक राहणार आहे.
वैद्यकीय कक्षात प्रवेश नाही, आलेल्या-गेलेल्यांची नोंद बंधनकारक -
रुग्णालयाच्या व्यवस्थापकांनी या खासगी रुग्णालयामध्ये विद्युत, पाणी व इतर आवश्यक सुविधा अखंडितपणे उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. तसेच, रुग्णालयामध्ये एका नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी. नोडल अधिकाऱ्यांची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांना देण्यात यावी. ज्या व्यक्ती निरीक्षणाखाली ठेवण्यात येतील, त्या वैद्यकीय कक्षात यासंदर्भात काम करणारे हॉस्पिटलचे कर्मचारी व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याशिवाय इतर कोणालाही प्रवेश राहणार नाही. तसेच, याठिकाणी आलेल्या व गेलेल्या प्रत्येक व्यक्तींच्या आवश्यक नोंदणी ठेवणे बंधनकारक राहील.
शासनाच्या अटी-शर्थींचा उल्लंघन केल्यास...
शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तींचे रुग्णालयामार्फत उल्लंघन झाल्यास परवानगी रद्द करून कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधीत हॉस्पिटलचे क्षेत्र हे फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आदेशात म्हटले आहे.
हेही वाचा - अँटिलिया प्रकरणी मोठा खुलासा; मनसुख हिरेनने दिली होती सचिन वाझेला स्कॉर्पिओची चावी
हेही वाचा - कोरोना नियमांचे उल्लंघन करून माहीम कोळीवाड्यात होळी साजरी