वाशिम - राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीवर मोठा परिणाम झाला आहे. महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर कापूस खरेदी सुरू झाली. मात्र, सध्या कासवगतीने होत असलेल्या कापूस खरेदीमुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
विक्रीअभावी अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरीच पडून आहे. खरीपाची पेरणी आता तोंडावर आली आहे. पण, शेतकऱ्यांचा कापूस मात्र विकला जात नसल्याने पेरणीसाठी बी-बियाणे आणि खतं कशी आणायची? हा सर्वात मोठा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना पडला आहे. सरकारी कापूस खरेदी अत्यंत संथगतीने सुरू असल्याने शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे.